पालघर : विद्यार्थ्यांना योग्य वेळेत योग्य धडे दिले तर ते कोणतीही गोष्ट चांगल्या पद्धतीने करतात, त्यांचा आत्मविश्वास वाढतो, ही बाब लक्षात घेता आंतरराष्ट्रीय योग दिनाचं ( International Yoga Day ) औचित साधून पालघर जिल्ह्यातल्या अडीच ते तीन हजारांपेक्षा अधिक शाळांमधल्या जवळपास 30 हजार विद्यार्थ्यांनी योग दिन उत्साहात साजरा केला. पालघर मध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, इनरव्हील क्लब ऑफ पालघर आणि प्रजापती ब्रह्मकुमारी यांच्या संयुक्त विद्यमान पालघरच्या लायन्स क्लब सभागृहात योग दिनाचं आयोजन करण्यात आलं होत. योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अधिकारी, नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध योग प्रकार केले.
जिल्हाभरात शाळा, महाविद्यालय, कंपन्या आणि विविध संघटनांकडून योग प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं होत. वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात महानगरपालिकेच्या प्रभाग समिती स्तरावर, सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, महानगरपालिका क्षेत्रातील विविध शाळा, महाविद्यालये, योग प्रशिक्षण संस्था, विविध सेवाभावी संस्थामध्येही आंतरराष्ट्रीय योग दिनाचं आयोजन करण्यात आलं होत. यावेळी उपस्थितांनी विविध योगासन करून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.