पालघर : कोकणी माणसाची जिद्द, चिकाटी, कष्ट करण्याची तयारी काय असते ते आर्किंड फुलांची शेती करुन दाखवुन दिलयं पालघर जिल्हयातल्या डहाणु तालुक्या मधल्या चिंचणी गावातल्या शेतकरी रामचंद्र रघुनाथ सावे यांनी. त्याच्या विशेष उपक्रमाला साथ लाभली ती प्रसिध्द फुल शेती तज्ञ आणि पुण्यातल्या राईज अँन शाईनच्या व्यवस्थापकीय संचालक भाग्यश्री पाटील यांची.
वाढवण बंदराला अखेर केंद्राची मंजुरी, ७६ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद……….
कोकण म्हटलं की आपल्या समोर येते ती म्हणजे तिथली भुरळ घालणारी निसर्गसंपन्नता. विशेषतः तिथला समुद्र किनारा, नारळ, सुपारी, आंबे यांच्या मोठ मोठ्या बागा आणि तिथली संस्कृती जपणारे वाडे. अशा संपन्न कोकणात विविध शेतकरी आपल्या शेतीमध्ये सतत काही न काही नवे प्रयोग करत असतात. असाच काहीसा वेगळा प्रयोग केलाय शेतकरी रामचंद्र सावे आणि त्यांच्या बंधूंनी. सावे यांच्याकडे स्वतःची फार कमी जमीन होती. त्यात ते भाजीपाल्याची शेती करत असत. शेतीची आवड आणि कष्ट करण्याची तयारी असल्यानं त्यांच्या चार भावांनी मिळुन आज पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्या मधल्या चिंचणी गावात शेती वाढविण्याचा निर्धार केला आणि तो सत्यात ही उतरविला.सावे यांना भाजीपाल्याची शेती करताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं. प्रसंगी त्यांचं आर्थिक नुकसानही झालं. हे करत असताना त्यांनी पुणे, कोल्हापुर, सांगली परिसरात ऑर्किड फुलांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधुन त्यांच्या प्रोजेक्टला भेटी दिल्या.दरम्यान त्यांनी भाग्यश्री पाटील यांच्या राईज अँन शाईन या कंपनीत जावून ऑर्किडच्या फुल शेती बद्दलची तांत्रिक माहिती जाणून घेतली. त्यावेळी त्यांनी तीन लाख साठ हजार रुपयांची ऑर्किड फुलांची रोपं या कंपनीतून खरेदी केली. त्यानंतर या कंपनीने सावे यांची थायलंड मधल्या ऑर्किड फुलांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी भेट करुन दिली. यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन कंपनीचे जनरल मँनेजर श्रावण कांबळे आणि त्यांच्या टिमनं केलं. त्यानंतर प्रयोगशील शेतकरी सवे यांनी आपल्या शेतात ऑर्किडच्या फुलांची शेती करण्यास सुरुवात केली. यातून येणाऱ्या भरघोस उत्पन्नातून त्यांनी आपल्या शेती क्षेत्रात वाढ केली. आणि आता ते जवळपास नऊ एकर क्षेत्रात शेडनेट मध्ये ही फुलांची शेती करत आहेत. दरम्यान त्यांच्या फुललेल्या ऑर्किडच्या शेतीला भेट देवून भाग्यश्री पाटील यांनी त्यांच्या जिद्दीचं कौतुक केलं.
रामचंद्र सावे यांच्या सोबत त्यांच्या भावाचा ३५ वर्षीय तरुण मुलगा प्रसाद सावे हा देखील ऑर्किड फुलांची शेती करण्यासाठी शेती क्षेत्राकडे वळला आहे. तो स्वतः अँटोमोबाईल इंजिनियर आहे. मात्र त्याने नोकरीची वाट न धरता पुर्णवेळ या फुलशेतीसाठी देण्याचा निर्धार केला आहे. आणि यात त्याला चांगलं यश देखील मिळालं आहे.
ऑर्किड फुलांना मुंबई, पुण्यासह इतर राज्यातुन ही मोठी मागणी असल्यानं आता याहीपुढे सावे बंधुनी ही फुल शेती वाढविण्याचा निश्चय केला आहे. शेतकऱ्याच्या जिद्दीला जर कष्टाची, ज्ञानाची आणि मदतीची साथ मिळाली तर काय साध्य होवू शकतं हे या सावे बंधुच्या ऑर्किड फुल शेतीच्या माध्यमातून दिसुन येतं. फक्त गरज आहे ती आता तरुण पिढीला या शेती व्यवसायात पुढे येण्याची. आणि शेतीच्या माध्यमातून आपल्या देशाला कृषीसंपन्न करण्यामध्ये हातभार लावण्याची.