पालघर : डोक्यावर छत नाही, कुटुंब, नातेवाईकांपासून कोसो मैल दूर, पोटाला भुकेने पडलेला चिमटा, सणासुदीचा तर विसर, ऊन, थंडी, पावसाचा मारा सहन करत आसरा शोधत फिरणाऱ्या बेघर, मनोरुग्णांना वसई-विरार पालिका आधारवड ठरत आहे. एकीकडे कुणीच आपले नाही, अशी भावना असताना पालिकेचे कर्मचारी त्यांच्यासाठी नातेवाईक झालेत. आता त्यांचे जीवन आनंदी होत आहे.
वसई-विरार महापालिकेनं ( Vasai-Virar City Municipal Corporation ) शहरात रेल्वे परिसर, बस डेपो परिसर तसचं सार्वजनिक ठिकाणी राहणा-या महिलांना, पुरुषांना त्यासोबतच लहान मुलांना आसरा मिळावा म्हणून निवारा केंद्र ( Nivara Kendra )उभारलं आहे. त्यासाठी पालिकेनं डोक्यावर छत नसलेल्या नागरिकांच्या विविध ठिकाणी जाऊन भेटी घेतल्या. आणि त्यांच्याशी बातचीत केली. आणि त्यांना या निवारा केंद्रात आणण्याची सोय केली.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थीना प्रत्यक्ष कामाची संधी
पालघर जिल्ह्यातलं हे एकमेव हे असं निवारागृह आहे की, जे पालघर जिल्ह्यातल्या वालीव मध्ये दोन एकर जागेत उभारण्यात आलं आहे. इथं बेघरां सोबतच मनोरुग्णांनाही निवारा देवून एक नवीन आयुष्य देण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यातल्या वसई-विरार महानगरपालिकेच्या राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान विभागाकडून वसईच्या पूर्वेकडील भागात असलेल्या वालीव शहरात हे बेघर निवारा केंद्र उभारण्यात आलं आहे. या निवारा केंद्राच्या व्यवस्थापन आणि देखभालीचं काम महानगरपालिकेच्या मार्गदर्शनाखाली बोधी बहुउद्देशीय सामाजिक विभाग करत आहे.
वसई-विरार शहरात बऱ्याच ठिकाणी बेघर, भिकारी, बेसहारा, दिव्यांग, वृद्ध, आजारी मुलं-मुली, पुरुष-स्त्रिया आढळून येतात. त्यांना याठिकाणी मोफत निवारा, जेवण, मनोरंजनासाठी सुख सुविधा आणि आरोग्य उपचार दिले जातात. त्यांची शासकीय रुग्णालयांमध्ये देखील आरोग्य तपासणी केली जाते. त्यासोबतच विविध पोलिस ठाण्याच्या माध्यमातून त्यांना निवारागृहात दाखल केलं जातं. या बेघर निवाराकेंद्राची क्षमता १०० लाभार्थ्यांची असून सध्या या ठिकाणी ४७ पुरुष, २८ महिला आणि तीन बालकं असे जवळपास ८८ लाभार्थी वास्तव्यास आहेत. महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रुपाली कदम आणि त्यांचं पथक अहोरात्र यांच्या देखभालीचं काम करत आहेत, जे अगदी कौतुकास्पद आहे. या निवारा केंद्रात असलेल्या नागरिकांची काळजी घेण्यासाठी व्यवस्थापकाच्या मार्गदर्शनाखाली महिला – पुरुष काळजीवाहक, नर्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवारा केंद्रात असलेल्या वयोवृद्धांची, मनोरुग्णांची काळजी घेण, त्यांची देखभाल करण हे अत्यंत जिकरीचं काम आहे. आजच्या काळात जिथे आपलीच मुलं आपल्या आई-वडिलांची, घरातल्या वयोवृद्धांची देखभाल करत नाहीत, कंटाळून त्यांना घराबाहेर काढून टाकतात किंवा वृद्धाश्रमात पाठवून देतात अशात अशा लोकांची रात्रंदिवस योग्य पद्धतीनं त्यांची काळजी घेण्याचं मोलाचं कार्य या निवारा केंद्रात नियुक्त करण्यात आलेले लोकं करतात. त्यामुळे इथं वास्तव्यास असलेले बेघर समाधान व्यक्त करत आहेत.