पालघर : सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय भारत सरकार, सामाजिक न्याय विभाग मंत्रालय महाराष्ट्र राज्य, समाज कल्याण आयुक्तालय पुणे, प्रादेशिक उपायुक्त मुंबई विभाग, कोकण भवन बेलापूर, जिल्हा परिषद पालघर समाजकल्याण विभाग आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त भारत अभियाना अंतर्गत स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून अमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा कार्यक्रम पालघरच्या आनंद आश्रम हायस्कूल मध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाची थीम विकसित भारत का मंत्र, भारत हो नशे से स्वतंत्र ही होती.
यावेळी सामाजिक न्याय विभाग आणि अधिकरिता मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करून त्यामध्ये मुलांना सहभागी करण्यात आलं. सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले आणि सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमार यांनी केलेलं मार्गदर्शन यावेळी विद्यार्थ्यांना एकविण्यात आलं. त्यांनतर केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या कार्यक्रमाची अमली पदार्थ मुक्तीची शपथ जवळपास ३५० विद्यार्थ्यांनी घेतली.
दरम्यान नशाबंदी मंडळाचे समन्वयक मिलिंद पाटील यांनी नशामुक्त भारत अभियानाची माहिती मुलांना समजवून सांगितली. आपल्या शाळेच्या परिसरात अशा अमली पदार्थांची विक्री अथवा वापर होणार नाही यासाठी आपण विद्यार्थी, शिक्षक वर्ग आणि कर्मचारी या सर्वांनीच सतर्क राहून राष्ट्रीय कार्यात हातभार लावावा असं आवाहन ही त्यांनी यावेळी केलं. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागा अंतर्गत येणाऱ्या ४३ वसतिगृहातील १,६७५ विद्यार्थीना ही अंमली पदार्थ विरोधी शपथ देण्यात आली.