सर्वेक्षणासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर
पालघर : डहाणू ते नाशिक दरम्यानच्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला आता मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच या सर्वेक्षणाचं काम सुरू होऊ शकेल. याविषयी माहिती देताना पालघर जिल्ह्याचे खासदार डॉ.हेमंत सवरायांनी सांगितलं की, 30 ऑगस्टला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालघर येथे येऊन देशातील सर्वात मोठ्या वाढवन बंदराचं भूमिपूजन केलं. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी बहुप्रतिक्षित अशा डहाणू-नाशिक रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली. या डहाणू-नाशिक रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे.
हेही पहा …..
पालघरचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांनी हि २५ वर्षांपूर्वी नाशिक ते डहाणू दरम्यान नवीन रेल्वे मार्ग म्हणजेच नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याची कल्पना केली होती आणि त्यासाठी पत्रव्यवहारही केला होता. मात्र निधीअभावी ते पूर्ण होऊ शकलं नाही. अधिवेशनादरम्यान मी रेल्वेमंत्री अश्वनी वैष्णव यांची भेट घेऊन त्यांना डहाणू ते नाशिक दरम्यानच्या नवीन रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण करण्याची विनंती केली होती.याची दखल घेत रेल्वेमंत्री आणि रेल्वे प्रशासनाने डहाणू नाशिक रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
हा रेल्वे मार्ग न केवळ डहाणू आणि नाशिक शहरांना जोडेल तर हा रेल्वे मार्ग आदिवासी भागातून आणि गावांमधून जाणार असल्याने विकासाच्या दृष्टिकोनातून आणि दळणवळणाच्या दृष्टीकोनातून खूप महत्त्वाचं योगदान देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आतापर्यंत फक्त मुंबईहून नाशिकला जाण्यासाठी गाड्या धावत होत्या. त्यामुळे पालघरच्या लोकांना नाशिकला जाण्यासाठी मुंबई सेंट्रलहून ट्रेन पकडावी लागते. आणि हा प्रवास बराच लांब पल्ल्याचा आहे. हे अंतर कमी करण्यासाठी आता डहाणू ते नाशिक असा रेल्वे मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.