गणेशोत्सवा मागची लोकमान्य टिळकांची विचारधारा आज ही जपत आहे उर्से गाव
पालघर : सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. गल्लोगलित लाडक्या बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आलेली दिसून येतेय. मात्र अशातच पालघर जिल्ह्यातल्या डहाणू मधल्या उर्से या गावी आजही एक गाव, एक गणपती ची संकल्पना कायम आहे.
भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण व्हावी यासाठी लोकमान्य टिळकांनी 1894 सालात सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात करत पुण्यातल्या विंचूरकर वाड्यात पहिल्यांदा श्री गणेशाची स्थापना केली होती.
डहाणू-नाशिक रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी………..
लोकमान्य टिळकांनी ज्या विचारातून या सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली होती त्याच विचारधारेला पुढे घेवून जात आहे पालघर जिल्ह्यातल्या डोंगराच्या कुशीत वसलेलं उर्से हे गाव. पालघर जिल्ह्यातल्या उर्से या गावात धनंजय कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून 1973 सालापासून एक गाव एक गणपती ही संकल्पना कायम सुरु आहे. यामुळे गावातील कुणबी आणि आदिवासी हे दोन्ही समाज एकत्र येत एकोप्याचा संदेश देतात.
गावात सार्वजनिक मंडळाची ही एकमेव बाप्पांची मूर्ती असली तरी गावात कोणाच्याही घरी बाप्पांची प्रतिष्ठापना करण्याची परवानगी दिली जात नाही. आणि म्हणूनच लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशानं या गणेशोत्सवाची सुरुवात केली तो उद्देश आजही उर्से गावातले ग्रामस्थ जपत आहेत. या गणेशोत्सवासाठी बाहेर गावातील कोणाचीही देणगी स्वीकारली जात नाही. विशेष म्हणजे सार्वजनिक असलेल्या या मंडळात बाप्पांची मूर्ती देण्यासाठी दरवर्षी गावकऱ्यांची मोठी लिस्ट असून यातून लॉटरी पद्धतीनं चिठ्ठ्या उडवून मूर्ती देण्याचा मान गावातल्या नागरिकांना दिला जातो.
दरवर्षी या गावातले तरुण एकत्र येवून बाप्पांच्या सजावटीतून वेगवेगळे सामाजिक संदेश देण्यासाठी विविध प्रकारचे देखावे तयार करत असतात. यंदा या गावातल्या तरुणांनी क्रिकेट विश्वविजेत्या भारतीय संघाचा सुंदर आणि हुबेहूब देखावा तयार केला आहे. जो आकर्षणाचा विषय ठरत आहे.
कोणताही सण असो या गावात प्रत्येक सण हा एकत्रित रित्या साजरा करण्याची परंपरा पूर्वीच्या लोकांनी सुरु केली होती. जुन्या काळात सुरु केलेली ही परंपरा या गावतल्या तरुणांनी आज ही तसीच कायम ठेवली आहे. त्यामुळे आजच्या काळातल्या लोकांसाठी आपण आपले सण कसे साजरे केले पाहिजेत यासाठी उर्से गाव एक आदर्श उदाहरण ठरू शकेल.