विरार : पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार शहरात महानगरपालिकेनं उभारलेल्या कृत्रिम तलावांना गणेशभक्तांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शहरात ५ दिवसीय गणपती विसर्जनात एकूण ७ हजार ५०८ गणेश मूर्तीचं विसर्जन झालं. त्यापैकी ४ हजार ९८१ गणेश मूर्तीचं म्हणजेच ६६.३४ टक्के विसर्जन हे कृत्रिम तलावात झालं. महापालिकेनं पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी केलेली जनजागृती, ठिकठिकाणी उभारलेले १०५ कृत्रिम तलाव, विसर्जनासाठी केलेल्या सोयी सुविधा यामुळे गणेश भक्तांचा कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचा कल वाढत आहे.
वसई विरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या संकल्पनेतून गेल्या २ वर्षापासून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. वसई विरार शहरात ५ दिवसीय गणपतीच्या विसर्जनात पालिकेकडून तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात ४ हजार ८७१ इतक्या घरगुती गणेशमूर्तीचं तर ११० सार्वजनिक मूर्तीचे विसर्जन करण्यात आलं. उर्वरित २ हजार ५२७ मूर्तीचे विसर्जन हे नैसर्गिक तलाव आणि समुद्रात झालं.
1973 सालापासून उर्से गावाची एक गाव एक गणपतीची परंपरा आज ही कायम
वसई विरार मधील सुजाण नागरिक पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागरुक आणि संवेदनशील असल्याने कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जनाचे प्रमाण वाढत आहे. गणेश भक्तांनी दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त करतो. येणाऱ्या सात दिवसीय, अनंत चतुर्दशी आदी विसर्जनावेळी देखील नागरिकांनी कृत्रिम तलावांना प्राधान्य द्यावे आणि निसर्गाची हानी टाळावी.
– अनिलकुमार पवार, आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका.