प्रारब्ध युग डेस्क : विधानसभा निवडणूक जवळ येत असताना आता राजकीय पक्षांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरु झाल्याचं पहावयास मिळत आहे. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यासह माजी खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय निरुपम आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंचे पीए रवी म्हात्रे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. म्हात्रे हे पैसे घेऊन पदे विकत असल्याचा आरोप संजय शिरसाट, निरुपम आणि शेलार यांनी केला आहे.
गेल्या पंधरा-वीस वर्षात ज्या – ज्या नेत्यांनी शिवसेना सोडली त्या सर्वांनीच शिवसेनेत खास करून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नजीकच्या लोकांकडून निवडणुकीत पैसे घेऊन तिकीट विकले जात असल्याचे आरोप केले आहेत. यात नारायण राणेंपासून तर राज ठाकरे या अनेक नेत्यांचा समावेश आहे. पैसे घेऊन विधानसभेचे किंवा महापालिकेचे तिकीट दिले जाते, असे आरोप करूनच राज ठाकरे देखील बाहेर पडले होते.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडलेले आणि शिवसेनेचा किल्ला लढवत असलेले संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी थेट रवी म्हात्रे आणि विनायक राऊत यांच्यावर आरोप करत म्हटलं कि, विनायक राऊत यांच्या मदतीने रवी म्हात्रे हे पैसे घेऊन पक्षातील लोकांना पदे विकत आहेत. पैसे आणा आणि पदे घ्या ही कार्यपद्धती सध्या उद्धवसेनेत सुरू असल्याचा आरोप देखील संजय शिरसाट यांनी केला आहे. विनायक राऊत हे उद्धव सेनेचे सचिव आहेत तर रवी म्हात्रे हे उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक आहेत.
हेही वाचा : टी.बी विरुद्धच्या लढाईत आता प्रौढांना देण्यात येणार बी.सी.जी लस
शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांनीही शिरसाट यांच्या आरोपांची पुष्टी केली. निरुपम यांनी आरोप करत म्हटलं की, उबाठा पैसे घेऊन काँग्रेस आणि शरद पवारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. त्या सोबतच भाजपचे आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनीही शिवसेनेच्या दाव्याला समर्थन दिलं. पैसे दो पैसे लो याच कामासाठी विनायक राऊत आणि रवी म्हात्रे पूर्वीपासून प्रसिद्ध असल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला आहे.
शिरसाट यांच्या या आरोपाला अद्याप तरी उद्धव सेनेकडून कोणीही प्रत्युत्तर देण्यात आलेलं नाहीये. लोकसभा निवडणुकीत देखील विनायक राऊत यांनी कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचे आरोप झाले होते. त्या आरोपांवर ही उद्धव ठाकरेंकडून कुठलीही चौकशी करण्यात आली नसल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.
अंधारें वर ही साधला निशाना :
उद्धव सेनेच्या महिला पदाधिकारी देखील पैसे घेतात, असा आरोप संजय शिरसाट यांनी केला. त्यांनी नामोल्लेख केला नसला तरी त्यांचा इशारा उद्धवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्याकडे असल्याचं म्हटलं जात आहे. असे आरोप होत असताना पक्षाकडून मात्र त्याबाबतीतली चौकशी केली जात नसल्याचं आरोपकर्त्यांचं म्हणणं आहे.