पालघर : आरोग्यसेवे अभावी गर्भवती माते मातेसह तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पालघर जिल्ह्यातल्या आरोग्यवस्थेचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू मधल्या सारणी इथं राहणाऱ्या पिंकी डोंगरकर या 26 वर्षीय गर्भवती मातेला रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. कासा उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी वलसाड इथं हलवत असताना या गर्भवती मातेचा आणि गर्भाशयातील बाळाचा मृत्यू झाला. वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे माता आणि बाळा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पालघर जिल्ह्यातल्या अनेक भागात अनेकदा वेळेत आरोग्य सेवा न मिळाल्यामुळे, किंवा रस्त्या अभावी रुग्णवाहिका गावात न पोहचू शकल्यामुळे गर्भवती माता आणि त्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याच्या घटना घडत असतात. मात्र प्रशासनाकडून या घटनांकडे कानाडोळा केलं जात असल्याचं दिसून येत. जिल्ह्यात योग्य आरोग्य सुविधा न मिळाल्याने गुजरात राज्यातल्या वलसाड, सिलवासा या ठिकाणच्या रुग्णालयात जाता-जाता किंवा नाशिक मधल्या रुग्णालयात जाता-जाता अनेकदा रस्त्यातच गर्भवती मातांना आपला जीव घमवावा लागतो. मात्र तरी देखील गेल्या 10 वर्षांच्या काळात पालघर जिल्ह्यात नागरिकांना आरोग्य सुविधा, सुसज्ज हॉस्पिटल उपलब्ध होवू शकलेलं नाहीये.
“ यावर पालघर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं कि, ज्यावेळेस हि महिला कासा रुग्णालयात पोहचली त्यावेळेस तिची स्थिती क्रिटीकल होती. ती बेशुद्धावस्थेत होती. कासा रुग्णालयात तिच्यावर प्राथमिक उपचार करून 108 रुग्णवाहिका न मिळाल्याने कासा उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्णवाहिके मध्ये तात्काळ तिला वलसाडच्या सिविल रुग्णालयात रेफर करण्यात आलं. “
डॉ. रामदास मराड – शल्य चिकित्सक, पालघर जिल्हा