पालघर : राज्यातील प्रत्येक विद्यार्थांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे हा दृष्टिकोन समोर ठेऊन शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहे. असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यातील ऐने येथील ग्राममंगल संचलित मुक्त शाळा या विद्यालयास मंत्री भुसे यांनी भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या सदस्या वैदेही वाढाण, ग्राममंगल संस्थेचे रमेश पानसे हेरंब कुलकर्णी, सचिन जोशी , श्याम सोनवणे तसेच अधिकारी शालेय शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
शिक्षणाच्या विविध पद्धतीच्या माध्यमातुन आनंददायी शिक्षण विद्यार्थ्यांना आपण कशा प्रकारे देऊ शकतो तसेच शिक्षण विभागामध्ये प्रदीर्घ कार्य करणाऱ्या शिक्षण तज्ञ शिक्षण क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या विविध संस्था यांच्या सूचना आदी विचारात घेऊन शैक्षणिक धोरण आखले जाणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
राज्यातील विविध शैक्षणिक संस्था मधील शिक्षकांशी तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून त्या अडचणी दूर करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.