प्रारंभिक बाल शिक्षणाला नवा आयाम
पालघर : वसई-विरार महानगरपालिका ( Vasai Virar City Municipal Corporation ) महिला व बालकल्याण विभागाकडून ( Department of Women and Child Development ) प्रारंभिक बाल्यावस्थेतील शिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी शहरातील ४१३ अंगणवाड्यांना लेसिंग बोर्ड, मासे पकडायचा खेळ, पेग बोर्ड, टच कार्ड्स, मोजणीचे मणी, आईस्क्रीमच्या रंगीत काड्या, प्राण्यांच्या कठपुतळ्या, कठपुतळी, बाहुली, कप्यांचा बोर्ड, ध्वनी पेटी, ४ तुकड्यांचे चित्रकोडे, कृती कार्ड, पटावरील खेळ, आकार किट, गोष्टीचे कार्ड, कवितेचे कार्ड, चित्र चर्चा कार्ड, रोल आणि कव्हर मॅट्स, मराठी अक्षरे, हुलाहूप, चेंडू, इमोशन बोर्ड, किट स्टोरेज बॉक्स अशी विविध प्रकारची शैक्षणिक खेळणी म्हणजेच जादुई पिटारा वितरित करून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे.
बालकांमध्ये सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि मूलभूत कौशल्ये विकसित करण्यासाठी हा संच तयार करण्यात आला आहे. या कार्यक्रमा अंतर्गत, अंगणवाडी सेविकांना ‘जादुई पिटारा’ चा प्रभावी उपयोग कसा करावा याचं प्रशिक्षण देण्यात आलं. अंगणवाडी सेविकांना या प्रशिक्षणाद्वारे लहान मुलांसाठी शिक्षण अधिक आकर्षक आणि समृद्ध कसं बनवावं याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं.
प्रारंभिक बाल शिक्षण मजबूत करण्याच्या हेतूने जादुई पिटारा”चं वितरण हे एक महत्वाचा टप्पा आहे. जादुई पिटारा” ही केवळ शैक्षणिक संसाधनांची पेटी नसून, ती या बालकांसाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीचं प्रवेशद्वार आहे. जादुई पिटाऱ्या मधल्या नविन्यपूर्ण संसाधनाच्या साहाय्यानं मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येईलअशी आशा महानगरपालिका प्रशासनाला आहे.
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या या जादुई पिटारा या उपक्रमामुळे अंगणवाडी प्रणाली अधिक सक्षम होवू शकेल. तसचं मुलांच्या प्रारंभिक बाल्यावस्थेतील शिक्षणाचा पाया अधिक मजबूत होण्यास मदत होऊ शकेल.