पालघर : पालघर जिल्ह्यात पालघर जिल्हा परिषदेच्या नेतृत्वाखाली नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य कडून आयोजित नशामुक्त भारत अभियाना अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी शपथ अभियानास मोठा प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात २ लाख ६२ हजार ८०४ विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत अंमली पदार्थांपासून दूर राहण्याची प्रतिज्ञा घेतली.
नशामुक्त भारत अभियानाचा मुख्य उद्देश हा युवकांमध्ये अंमली पदार्थांविरोधी जागरूकता निर्माण करणे, त्यांना व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करणे, समाजाला या विळख्यातून मुक्त करणे, युवकांना सुजाण आणि जबाबदार नागरिक हा आहे.
पालघर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, आश्रमशाळा, वसतीगृहे, खाजगी शाळा, महाविद्यालय अशा जवळपास १,३८६ शाळा आणि महाविद्यालयां मधल्या विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कार्यातयातल्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी देखील नशामुक्त भारत अभियानात आपला सहभाग नोंदवत अंमली पदार्थ विरोधी शपथ घेतली.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, समाजकल्याण अधिकारी प्रवीण भावसार, तसचं महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाचे समन्वयक मिलिंद पाटील उपस्थित होते.