मोखाडा सारख्या अतिदुर्गम भागातले आदिवासी शेतकरी करू लागलेत फ्रेंच बीन ची शेती
पालघर : पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून सागरी, नागरी आणि डोंगरी अशा तीन विभागात मोडतो. इथे आदिवासी लोकवस्ती ही मोठ्या प्रमाणात आहे. याच पालघर जिल्ह्यातला मोखाडा हा भाग अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. या भागातली पाणी टंचाई, कुपोषण, आरोग्य समस्या यासारख्या कारणांमुळे हा भाग सतत चर्चेत असतो. मात्र याच मोखाडा सारख्या अतिदुर्गम भागातले शेतकरी आता आपल्या शेतीत नव नवे प्रयोग करून शेती क्षेत्रात पुढे येऊ लागले आहेत. आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम देखील होऊ लागले आहेत.

मोखाडा भागातला पहिला यशस्वी प्रयोग
पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्या मधल्या आसे आणि बरिस्ते गावातल्या 20 प्रयोगशील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात फ्रेंच बीन लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्पांतर्गत या भागात पहिल्यांदाच या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात प्रत्येकी 10 गुंठे क्षेत्रावर फ्रेंच बीन ची लागवड केली आहे.
या भागातले शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावेत, त्यांनी भात शेती व्यतिरिक्त इतर ही पीक आपल्या शेतात घ्यावीत, या जोड शेतीतून त्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध व्हावा या उद्देशाने दीपक फाउंडेशन या संस्थेने जे.एम.फॅनानशियल फाउंडेशन च्या साहाय्याने या गावांमधल्या शेतकऱ्यांना एकत्रित करून त्यांना सुरुवातीला या शेतीविषयक प्रशिक्षण दिलं. त्यासोबतच या शेतकऱ्यांचा नाशिक मधल्या एपीएमसी मार्केट मध्ये एक अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना लिलाव प्रक्रिया, ग्रेडिंग, पॅकिंग आणि वेळेवर बाजारात पोहोचण्याचं महत्व आदी गोष्टी समजून घेण्यास मदत झाली.
आता हे शेतकरी आपल्या शेतात यशस्वीरित्या फ्रेंच बीनचं उत्पादन घेत आहेत. मोखाडा इथून नाशिक शहर जवळ असल्याने शेतकऱ्यांच्या या शेतमालाला नाशिक मार्केट मध्ये चांगली बाजारपेठ देखील उपलब्ध झाली आहे. या क्षेत्रात पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी केलेल्या फ्रेंच बीन च्या लागवडीतून त्यांना चांगला आर्थिक नफा होत असल्याचं हे प्रयोगशील शेतकरी सांगतात.
या नव्याने सुरू झालेल्या आणि याआधी पारंपरिक शेतीचा भाग नसलेल्या नव्या प्रयोगामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीच्या आर्थिक आणि तांत्रिक बाजूंचं महत्त्व आता समजू लागलं आहे. यंदा या शेतीतून होत असलेल्या सकारात्मक नफ्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पुढील हंगामात ही फ्रेंच बीन ची शेती करण्यात उत्सुकता दर्शवली आहे.
या लागवडीतून आम्हाला चांगलं उत्पन्न मिळत आहे. लागवडीचे आणि विक्रीची प्रशिक्षण ही दिले.
भाऊराव झिजुरडे – शेतकरी, मोखाडा …
प्रायोगिक तत्त्वावर या भागात वेगवेगळ्या शेती क्षेत्रातल्या ॲक्टिव्हिटी सुरू केल्या आहेत. यात फ्रेंच बीन लागवडीचा समावेश आहे. 20 शेतकऱ्यांच्या माध्यमातून हा प्रयोग करून पाहिला. नाशिक मार्केट मध्ये या मालाला चांगल्या प्रकारची मागणी आहे. यामधून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे.
रियाज मुलानी – प्रोग्राम मेनेजर, दिपक फाउंडेशन
शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण शेतीचे तंत्रज्ञान अवगत करून दिले. या भागातल्या 17 हजार लाभार्थ्यांना आम्ही शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे.
सुनील काळे – जे.एम.फॅनानशियल फाउंडेशन…