पालघरमध्ये १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात
पालघर : पालघर ( Palghar ) जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ( Mumbai-Ahmedabad National Highway ) आज भीषण अपघाताची घटना घडली आहे. साखरपुड्याच्या वऱ्हाडाला घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोला भरधाव ट्रेलरने जोरदार धडक दिल्याने १३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालय ( Kasa Sub-District Hospital ) आणि धुंदलवाडी येथील वेदांता हॉस्पिटल ( Vedanta Hospital in Dhundalwadi ) मध्ये उपचार सुरू आहेत. घटनास्थळी प्रशासन, पोलीस आणि बचाव पथकांकडून मदतकार्य सुरू आहे.
पहा व्हिडीओ :
सोमवारी संध्याकाळी चार वाजताच्या दरम्यान हा भीषण अपघात घडला. डहाणूच्या ( Dahanu ) बापूगाव इथून ३० ते ४० वऱ्हाडी आयशर टेम्पोमधून साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी धानीवरी ( Dhanivari ) इथे येत होते. मात्र एक किलोमीटर चा वळसा न घालता वऱ्हाडाच्या टेम्पो चालकाने आऊटसाईड ने टेम्पो नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान धानीवरी गावाजवळ गुजरात हून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रेलर चालकाचे ट्रेलरवरील नियंत्रण सुटलं आणि तो ट्रेलर .एका बाईक स्वाराला चिरडून थेट वऱ्हाडाच्या टेम्पोवर उलटला. हा अपघात इतका भीषण होता की, या टेम्पोखाली चिरडून 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, महामार्ग पोलीस, रुग्णवाहिका आणि बचाव पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. आणि बचावकार्य सुरू केलं. सध्या १४ जखमींवर धुंदलवाडी येथील वेदांता रुग्णालयात उपचार सुरू असून काही जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहेत. मृतांमध्ये सुरेश लाखात, पांडू लाखात, काळू लाखात, सुनील दांडेकर, चिमा कुरहाडा, नमिता दांडेकर, सारिका लाखात, आयुष लाखात, सागर शेंडे, वंदना वळवी, सलोनी वळवी, अजय अहाडी आणि रियांशी लाखात अशा 13 जणांचा समावेश आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
















