पालघर ( नीता चौरे ) : पालघरच्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कार नंतर आता सौर ऊर्जेवरील बोटीची संकल्पना पुढे आणली आहे. सध्या सौर बोट जिल्ह्यात सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.
आयटीआय च्या अभ्यासक्रमात असलेला पॉवर जनरेशन चा टॉपिक मुलांना प्रत्येक्षात प्रोजेक्ट च्या माध्यमातून समजावा या उद्देशानं ऊर्जेवरील बोटीची संकल्पना पुढे आली. पालघरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आय.टी.आय) च्या विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कार नंतर आता सौर ऊर्जेवरील बोटीची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे.
ही बोट बनविण्यासाठी त्यांना साधारपणे 90 हजारांचा खर्च आला आहे. ही सर्व रक्कम विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि प्रिंसिपल यांनी मिळून जमा केली. आणि मग स्व-खर्चातुन ही सोलर बोट तयार केली. ही सौर ऊर्जेवरील बोट निदेशक – जे.आर.पाटील, के.बी.अहिरे, प्रिंसिपल एस.एन.परदेशी, सहसंचालक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बनवण्यात आली आहे.
पालघर आय.टी.आय चे प्रिंसिपल एस.एन.परदेशी आकाशवाणीशी याविषयी बातचीत करताना म्हणाले की, भविष्यात पेट्रोल, डिझेल सारख्या इंधनांचा तुटवडा भासु शकेल. त्यामुळे येणा-या काळात टेक्नोलॉजी आणि बरयाच सिस्टिम ह्या सौर ऊर्जेवर आधारित असू शकतील. त्यामुळे नक्कीच सौर ऊर्जेचा वापर वाढू शकतो. त्यासाठी चा एक छोटासा प्रयत्न म्हणून आम्ही ही सोलर बोट तयार केली. जेणेकरून पुढच्या पिढीला प्रदुषण मुक्त जीवन जगता यावं.
पालघर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात समुद्र किनारपट्टीचं वैभव लाभलं आहे. त्यामुळे इथं पर्यटन व्यवसायाला भरपूर वाव आहे. पुढे भविष्यात
या सौर ऊर्जेवर चालणार्या बोटीं छोट्या मासेमारी व्यवसायासाठी, पर्यटनासाठी, बोटींग आदींसाठी वापरता येवू शकतील. तसचं या सौर ऊर्जेवर चालणार्या बोटींच्या वापरामुळे जल प्रदुषणाला ही आळा घालता येईल.