नीता चौरे / पालघर : पालघर जिल्ह्याला तसं तर मोठ्या समुद्र किना-यांचं जणु वैभवचं लाभलं आहे. पालघर जिल्हयाचं क्षेत्रफळ 5344 चौ.कि.मी असून पालघर जिल्हयाला जवळपास 85 कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. त्यामुळे इथल्या कुठल्या न कुठल्या समुद्र किनार्यावर नवनवीन माश्यांच्या प्रजातीचं दर्शन घडत असतं.
आता सध्याच दोन- तीन दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यातल्या वाढवण समुद्र किनारी ( FLYING FISH ) पाखरू मासा दिसून आला होता. आता त्यानंतर आज पुन्हा पालघर जिल्ह्यातल्या वरोर इथले मच्छीमार विकास भोईर यांना त्यांच्या जाळ्यात ( Redtoothed Trigger Fish ) रेड टूथ ट्रिगर फिश नावाचा अनोखा मासा मिळून आला आहे. शास्त्रीय भाषेत या माशाला ओडोनस नायगर असं म्हणतात.
रंगानं निळा जांभळा असणारा हा मासा त्याच्या स्वभावानुसार रंग देखील बदलू शकतो. कधी तो गडद निळा तर कधी तो फिकट हिरवा देखील दिसतो. त्याचे दात लाल रंगाचे असल्यामुळे त्याला रेड टूथ असं देखील म्हणतात. स्वभावानं हा मासा आक्रमक असतो. जास्तीत जास्त बारा इंच पर्यंत या माश्यांची वाढ होते.
ज्या ठिकाणी प्रवाळ खडकांची रांग असते अश्या ठिकाणीच या माशांचं वास्तव्य असतं. ज्या ठिकाणी पाण्याला प्रवाह जास्त असतो अश्या अधिवासात राहण्यासाठी हे मासे विकसित झालेले आहेत. विशेष बाब म्हणजे एखाद्या खाच – खळग्यात ते शिरून त्याच्या शेपटीचा उपयोग स्वतः ला अडकवून ठेवण्यासाठी करतात. या वरून वाढवण इथल्या समुद्रात मोठ्या प्रवाळ खडकांची रांग असण्याची शक्यता आहे. शिवाय अश्या कित्तेक दुर्मिळ माशांचा इथे अधिवास आणि प्रजनन केंद्र आहे.
हे मासे किनारपट्टीच्या उथळ किनार्यावरील पाण्यात सुमारे 30 – 100 फूट (9 – 30 मीटर) खोलीत राहू शकतात. तर दगडां मधल्या खाच खळग्यात हे त्यांची अंडी देतात. आणि पिल्ले बाहेर येई पर्यंत त्यांचं रक्षण करतात.
रेड टूथ ट्रिगर फिश च्या प्रजाती व्यापक इंडो-पॅसिफिक महासागर आणि रेड सी इथं आढलुन येतात. तसचं ते आफ्रिकेच्या पूर्वेकडील किना-यावर आणि सोसायटी बेटांवर देखील आढळतात. तर दक्षिण जपानच्या उत्तरेस आणि ऑस्ट्रेलिया मधल्या ग्रेट बॅरियर रीफच्या दक्षिणेस देखील पहावयास मिळू शकतात.
जणू काही आम्ही इथे आहोत आम्हाला नष्ट करू नका हेच सांगण्यासाठी एका मागून एक मासा जीवाची पर्वा न करता समोर येऊन आपलं अस्तित्व दाखवून द्यायला लागला आहे. माणसांसोबत मासे ही आंदोलनात सहभागी होत आहेत अस म्हंटले तर काही वावग ठरणार नाही. हा मानवजातीसाठी एक संदेश आहे. की निसर्गाच्या योग्य बाजूला उभा राहा नाहीतर नष्ट होशील… असं मतं सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभागाचे सह.प्रा भूषण भोईर यांनी व्यक्त केलं आहे.