नीता चौरे / बोईसर : राष्ट्रीय हरीत न्यायाधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडच्या दावा क्र. 64/2016 मध्ये दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांना आदेशित केलेलं असून त्या अनुषंगानं महाराष्ट्र आद्योगिक विकास महामंडळ, तारापूर इथल्या उद्योगांचं सर्वेक्षण करत असतांना बरेचसे टँकर पाणी वाहून नेत असतांना आढळले. आणि विविध प्रकारच्या घातक टाकाऊ रसायनांची वाहतूक करुन अनधिकृतपणे त्यांची विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे परिसरात रासायनिक दर्प पसरतो. आणि सभोवतालच्या परिसरातल्या पर्यावरणाचा -हास होतो. तसचं महाराष्ट्र आद्योगिक विकास महामंडळ, तारापूर कार्यक्षेत्रामध्ये टँकरव्दारे पाणी उपलब्ध करुन पाण्याचा अधिक वापर केला जात असल्यानं अधिकचं effluent तयार होते. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या 25 MLD CETP वर विपरीत परिणाम होत असल्याचं ही निर्देशनास आलं आहे.
महाराष्ट्र आद्योगिक विकास महामंडळ, तारापूर क्षेत्रात पाणी पुरवठा करणारे टैंकर बंद केल्यास पाण्याचा वापर कमी होऊन effluent कमी तयार होईल. असं झाल्यास परिसरात प्रदुषण कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे महाराष्ट्र आद्योगिक विकास महामंडळ, तारापूर क्षेत्रात पाण्याचा पुरवठा करणा-या टैंकरची वाहतूक करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(1) (2) व (3) आणि कलम 133 नुसार 5 डिसेंबर पासून ते 2 फेब्रुवारी पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आलेला आहे. त्यात फायरटेंडर वाहनं वगळण्यात आली आहेत. आणि असाधारण परिस्थितीत पाण्याच्या टँकरची वाहतूक करायची असल्यास MIDC ची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे.
महाराष्ट्र आद्योगिक विकास महामंडळ, तारापूर मधल्या सर्व औद्योगिक, उद्योग आणि इतर आस्थापनांनीया मनाई आदेशाचं पालन करण्याचं आवाहन जिल्हादंडाधिकारी डॉ .माणिक गुरसळ यांनी केलं आहे.