नीता चौरे / पालघर : महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री , भाजप नेते विष्णू सवरा यांचं यांचं दीर्घ आजारानं बुधवारी मुंबईतल्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालय वैद्यकीय उपचार सुरु असताना निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. आज ते पंचतत्वात विलीन झाले असून त्यांच्या पार्थिवावर वाड्यातल्या स्मशानभूमीत 3 वाजताच्या जवळपास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचा मुलगा डॉ. हेमंत सवरा यांनी त्यांच्या पार्थिवास अग्नी दिली.
मुंबईतल्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात सुरु होते उपचार :
गेल्या 2 वर्षापासून ते यकृताच्या आजारानं त्रस्त होते. काही वर्षापूर्वी त्यांच्यावर यकृत रोपण आणि हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्यानं त्यांना 18 नोव्हेंबर पासून मुंबईतल्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. वैद्यकीय उपचार सुरु असताना बुधवारी रात्री 8 वाजताच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
आज राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. त्यांच्यासह खासदार कपिल पाटील, माजी मंत्री मधुकरराव पिचड, रवींद्र चव्हाण, जगन्नाथ पाटील, आमदार सुनील भुसारा, राजेश पाटील, श्रीनिवास वनगा यांच्यासह अनेकांनी त्यांचं अत्यदर्शन घेतलं.
त्यांच्या निवासस्थानापासून निघालेल्या अंत्ययात्रेत सवरांचे चाहते मोठ्यासंख्येनं सहभागी झाले होते. सवरांच्या निधनामुळे संपूर्ण वाडा शहरातल्या बाजरपेठा ही बंद ठेवण्यात आल्या होत्या.
सवरा वाडा विधानसभेतुन 4 वेळा आणि विक्रमगड विधानसभेतुन 2 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तसचं त्यांनी 1995 च्या काळात आदिवासी राज्यमंत्री, 2014 ते 2019 पर्यंत आदिवासी विकास कॅबिनेट मंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिलं आहे. सवरा यांच्या जाण्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सून नातवंडे असा परिवार आहे.