पालघर / नीता चौरे : पालघर जिल्हयातल्या बोईसर तारापुर औद्योगिक (M.I.D.C) क्षेत्रातल्या प्रदुषणामुळे प्रभावित होत असलेल्या १६ गावांमध्ये विशिष्ट आजारांसाठी विशेष आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्याच्या सूचना राष्ट्रीय हरित लवादानं पालघर जिल्हा परिषदेला दिल्या होत्या. या सूचनांना अनुसरुन डिसेंबर महिन्यात या १६ गावांचे सर्वेक्षण आरोग्य विभागानं पूर्ण केलं असून यात त्वचा आणि श्वसन विकारांचे रुग्ण शोधण्यात आलेत.
या सर्व रुग्णांची प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय आरोग्य शिबीरं ही जानेवारी महिन्यात आयोजित करण्यात आली आहेत. या शिबीरांमध्ये ज्या रुग्णांना विशेषज्ञांच्या सल्ल्याची गरज लागेल त्यांच्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन त्यानंतर करण्यात येणार आहे. ही सर्व शिबीरे आणि त्याअंतर्गत सर्व सेवा या पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात येणार आहेत.
पालघर तालुक्यातल्या ५ प्राथमिक आरोग्य केंद्रांअंतर्गत तारापूर, कांबोडे, घिवली, दांडी, उच्छेळी, मुरबे, आलेवाडी, टेंभी नवापूर, सातपाटी, खारेकुरण, शिरगांव, माहिम, वडराई, केळवा आणि दादरापाडा या गावांना या सेवेचा लाभ होणार असल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आलीयं.