रत्नागिरी / प्रमोद कोणकर : रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्रसिद्ध धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनस्थळ असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वराचा वार्षिक यात्रोत्सव यावर्षी करोनामुळे रद्द करण्यात आला आहे. मार्लेश्वर देवस्थानचे विश्वस्त सुनील लिंगायत, गिरीजादेवीचे मानकरी बापू शेट्ये, काका शेट्ये, सोळजाई देवस्थानचे अध्यक्ष बापू गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संपूर्ण महाराष्ट्रात मार्लेश्वर देवस्थान प्रसिद्ध आहे. दरवर्षी मकर संक्रांतीला तेथे होणारा कल्याणविधी म्हणजेच मार्लेश्वर-गिरीजादेवीचा विवाह सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक उपस्थित राहतात. यावर्षी मात्र यात्रोत्सव होणार नाही. केवळ धार्मिक विधी मानकरी आणि निवडक लकांच्या उपस्थितीत होणार आहेत. यात्रेला येण्यासाठी भाविकांना बंदी करण्यात आली आहे. भाविकांनी गर्दी करू नये यासाठी एसटीच्या जादा फेऱ्या सोडण्यात येणार नाहीत. तसेच खासगी वाहनांनाही प्रवेश बंदी असणार आहे. येत्या १३ ते १५ जानेवारी या कालावधीत मार्लेश्वरमधील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.
यात्रोत्सव रद्द केल्याची दखल घेऊन भाविकांनी मार्लेश्वरला येऊ नये आणि विनाकारण गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. या बैठकीत पोलीस उपनिरीक्षक बाइंग आणि किशोर जोशी यांनी ही मार्गदर्शन केले. यावेळी प्रकाश शिंदे,संतोष लाड,नगरसेवक प्रफुल्ल भुवड तसेच साखरपा, देवरूख, मारळ, आंगवली येथील मानकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.