पालघर : पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असल्यानं जिल्हयात मानव विकास कार्यक्रमांतर्गत आरोग्यविषयक, शिक्षणविषयक विविध योजना राबविण्यात येत आहेत. अशाच विविध योजनांपैकी अनुसूचित जाती / जमाती / दारिद्रय रेषेखालील बाळंत महिलेला बुडीत मजूरी देणे ही एक महत्त्वपूर्ण आरोग्यविषयक योजना आहे. हि योजना महिलांसाठी अत्यंत लाभदायक असल्याचं जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितलं आहे.
बाळंतपणात महिलांना आराम मिळावा, संस्थात्मक बाळंतपणास प्रोत्साहन मिळावं, माता मृत्युदर आणि बालमृत्युदर कमी व्हावा हे योजनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजने अंतर्गत “अनुसूचित जाती / जमाती / दारिद्रय रेषेखालील पात्र बाळंत महिलांना 4 हजार इतकी रक्कम बुडीत मजुरी म्हणून दिली जाते. त्यात प्रसूती पूर्वी 2 हजार आणि प्रसूती नंतर 2 हजार अश्या दोन टप्यात ही रक्कम दिली जाते.
पालघर जिल्हयाकडून २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातल्या 29 प्राथमिक आरोग्य केंद्रामधल्या आतापर्यंत 4077 पात्र लाभार्य्यांसाठी एकूण १६३.०८ लक्ष रूपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यापैकी ४०७३ मातांना आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळाला असल्याची माहिती मानव विकास चे सहायक जिल्हा नियोजन अधिकारी प्रवीण देशमुख यांनी दिली आहे.
आदिवासी भागातल्या दारिद्य रेषेखालील कुटुंबातल्या महिलांना बाळंतपणात पुरेसा आराम न मिळाल्यानं त्यांच्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर अशा महिलांसाठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेली “अनुसूचित जाती / जमाती / दारिद्रय रेषेखालील बाळंत महिलेला बुडीत मजुरी देणे” ही योजना नक्कीच उल्लेखनीय ठरू शकेल.