पालघर / नीता चौरे : पालघर जिल्ह्याला तसं तर निसर्गत: समुद्रकिनाऱ्यांचं वैभवचं लाभलेलं आहे. जिल्ह्याची पश्चिम किनारपट्टी म्हटली की सौंदर्यानं नटलेली किनारपट्टी संबोधली जाते. या किनारपट्टी भागात अनेक ठिकाणं ही सुशोभित किनारपट्टी, पिकनिक पॉईंट आणि पर्यटन स्थळांनी सजलेली आहेत.
तर काही ठिकाणी ही किनारपट्टी गजबजलेली असली तरी देखील यातली काही ठिकाणं अशी आहेत की ती शांत आणि गर्द झाडाझुडपांनी विस्तारलेली आहेत. त्यामुळे अशा भागात विविध जातीचे स्थलांतरित पक्षी येऊन वास्तव्य आणि विहार करत असतात. सध्या अशाच काही स्थलांतरित परदेशी पक्षांची रेलचेल पालघर जिल्ह्यातल्या चिंचणी, वाढवण, तारापूर किनाऱ्यालगतच्या पाणथळ भागात पाहायला मिळतेय.
गुलाबी थंडी सुरू झाली की या भागांत स्थलांतरीत परदेशी पक्षांचं आगमन होऊ लागतं. त्यातलाच एक पक्षी म्हणजे कलहंस. याला इंग्रजी भाषेत GREYLAG GOOSE असं म्हणतात. याच परदेशी पाहुण्यांच्या थव्यांनी सध्या तारापूर, चिंचणी, कलोवली या भागातल्या पानथळ भागांत हजेरी लावली आहे.
कलहंस हा पक्षी मध्यम आकाराच्या पाळीव हंसा एवढा दिसतो. हा हिवाळी पाहुणा रंग रूपानं आणि आकारानं धूसर रंगाच्या पाळीव हंसाप्रमाणे दिसतो. याचा शेपटीकडील भाग करड्या रंगाचा आणि चोच मांसल गुलाबी असते. हा हिवाळी पाहुणा पाकिस्तान ते मणिपूर, चिलका सरोवर, ओरिसा या भागात मोठ्या प्रमाणात आढळतो. हा पक्षी मध्यप्रदेशात आणि महाराष्ट्रात दुर्मिळ प्रमाणात आहे. पुढे दक्षिणकडे हा सहसा आढळून येत नाही. हा पक्षी नद्या, सरोवरे, धानाची शेती आणि गवती कुरणे अशा भागात आढळतो.
सध्या कलहंस हे पक्षी पालघर जिल्ह्यातल्या तारापूर, चिंचणी आणि कलोवली या भागातल्या पानथळ भागांत आले आहेत. त्यामुळे पक्षी मित्रही या स्थलांतरित पक्षांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी उत्सुक असतात. चिंचणी मधले पक्षीतज्ञ आशिष बाबरे, पक्षीनिरीक्षक प्रवीण बाबरे, भावेश बाबरे यांनी या पक्षांची क्षणचित्रे आपल्या कॅमेऱ्यात टिपली आहेत. केवळ जिल्हयातलेचं पक्षीमित्र नव्हे तर या पक्षांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी आजूबाजूच्या शहरातले पक्षीमित्र देखील या भागात हजेरी लावत आहेत.