पालघर / नीता चौरे : शेतकर्यांच्या फळ आणि भाज्या ह्या जलद गतीनं थेट बाजारपेठे पर्यंत पोहचाव्यात यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 7 ऑगस्ट 2020 ला किसान रेल योजना सुरु केली होती. आता याच किसान रेल योजनेचा लाभ पालघर जिल्ह्यातल्या शेतक-यांना देखील घेता येणार आहे. पालघर जिल्ह्यातल्या पच्छिम रेल्वेच्या डहाणु रेल्वे स्थानकातुन शनिवारी दुसर्यांदा डहाणुचा चिकू थेट दिल्लीत घेवुन जाणारी किसान रेल्वे मध्यरात्री 2 वाजताच्या जवळपास दिल्लीला रवाना झाली. यावेळी डहाणुतुन 3 कोच मध्ये 30 टन इतका चिकू पाठवण्यात आला आहे. डहाणु – उधवाडा – अमलसाड – दिल्ली ( आदर्शनगर ) असा या ट्रेनचा मार्ग असणार आहे. या ट्रेनला डहाणुत 3 कोच, उधवाडा मध्ये 2 कोच आणि अमलसाड मध्ये 16 कोच लागणार असून अशा 21 कोच असलेली ही किसान रेल जवळपास 22 तासांत हे चिकू दिल्लीच्या बाजारपेठेत दाखल करते.
पहिल्यांदा 27 जानेवारीला डहाणु रेल्वे स्थानकातुन डहाणुचा चिकू थेट दिल्ली घेवुन जाणारी किसान रेल्वे मध्यरात्री 2 वाजताच्या जवळपास दिल्लीला रवाना झाली होती. त्यावेळी 6 कोच मध्ये 60 टन इतका चिकू या रेल्वेच्या माध्यमातून दिल्ली पाठवण्यात आला होता. पहिल्यांदा 22 तासांत ही किसान रेल डहाणुहुन दिल्लीला पोहचली होती. यावेळी डहाणुच्या सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही ट्रेन दिल्लीसाठी रवाना झाली होती.
पालघर जिल्ह्यातला डहाणु तालुका हा चिकू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. डहाणु, घोलवड, बोर्डी भागांत शेतकरी मोठ्या प्रमाणात चिकूची लागवड करतात. इथं अंदाजे 5 हजार हेक्टर क्षेत्रात पिकाची लागवड करण्यात आलीय. हंगामात 200 टन च्या जवळपास तर इतर वेळी 100 टनच्या चिकू जवळपास चिकू निघत असतो.
पूर्वी चिकू हे फळ ट्रकच्या माध्यमातून इतरत्र पाठवलं जात असे. त्यामुळे ते बाजारपेठे पर्यंत बऱ्याचं उशिरा पोहचत असे. आणि त्यात काही प्रमाणात फळ खराब ही होत असे. आणि ही वाहतुक खर्चिक ही आहे. मात्र आता ही किसान रेल इथून सुरु केल्यानं कमी खर्चात, कमी वेळेत आणि चिकू फळाची कोणत्याही प्रकारची नासधूस न होता ते थेट दिल्लीच्या बाजारपेठेत पोहचत आहे. तसचं 50 टक्के सबसिडी मिळत असल्यामुळे याचा फायदा शेतकर्यांना आणि व्यापा-यांना होत असल्याची माहिती यावेळी चिकू व्यापारी राजेश ठाकुर यांनी दिली.
तर जिल्ह्यात सुरु झालेली ही किसान रेल सेवा केवळ सोमवार , गुरुवार या दिवसांसाठी न ठेवता ती दररोज सुरु करावी आणि सध्या डहाणुसाठी देण्यात येणार्या रेल्वे डब्ब्यांची संख्या वाढवून ती कमीत कमी 10 डब्ब्यांपर्यंत करावी अशी मागणी इथल्या व्यापारी वर्गाकडून करण्यात येत आहे.