मुंबई : परळ येथील ग्लोबल रूग्णालयात कोरोनामुक्ती नंतर ‘म्यूकोर्मिकोसिस’ हा बुरशीजन्य आजार झालेल्या महिलेचे प्राण वाचवण्यात आले. या बुरशीजन्य संसर्गाने हाडांची झीज होणे, स्नायू कमकुवत होणे, डोळ्यांवर दुष्परिणाम होणे अशा तक्रारी होत आहेत.
दरम्यान म्यूकोर्मिकोसिस म्हणजे एक प्रकारे फंगल इन्फेक्शन असून हा अतिशय जीवघेणा आहे. या रूग्णांची संख्या सध्या वाढताना दिसून येत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. त्यासाठी फंगल इन्फेक्शनवर तातडीने उपचार व्हावेत असा सल्ला ते देत आहेत. यासाठी परळ येथील ग्लोबल रूग्णालयात ‘म्युकॉरर्मायकोसिस’ क्लिनिक सुरू करण्यात आले असून ‘फंगल इन्फेक्शन’ वर उपचार करणारं मुंबईतलं हे पहिलं क्लिनिक ठरलं आहे.
महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यात राहणाऱ्या शैला सोनार यांना कोरोनामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने आणि रक्तातील साखरेच्या कमतरतेमुळे ‘म्यूकोर्मिकोसिस’ हा दुर्मिळ आजार झाला होता. या महिलेच्या नाकात आणि डोक्यापर्यंत हा संसर्ग पोहोचला होता. स्थानिक रूग्णालयात या महिलेवर चार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्रास वाढू लागल्याने कुटुंबियांनी तिला डिसेंबर महिन्यात मुंबईतल्या ग्लोबल रूग्णालयात दाखल केलं. याठिकाणी महिलेवर अँटी-फंगल थेरपी सुरू करण्यात करण्यात आली. शस्त्रक्रियेद्वारे संसर्ग झालेल्या डोक्यावरील टाळूचा अर्धा भाग काढून टाकण्यात आला. वेळीच उपचार झाल्याने या महिलेचे डोळे वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे.
यावर सर्जन डॉ. मिलिंद नवलखे सांगितलं कि म्यूकोर्मिकोसिस या आजाराचा धोका मधुमेह असलेल्या आणि रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या रूग्णांना अधिक असतो. कोरोनमुक्त झालेले ५० हून अधिक रूग्ण मागील तीन महिन्यात रोगप्रतिकार शक्तीच्या कमतरतेमुळे बुरशीजन्य आजाराचा संसर्ग झाल्याने उपचारासाठी आले होते.
यात रूग्णाला सर्दी आणि नाकाला सूज येते. यावर वेळीच उपचार न झाल्यास डोळ्यावर परिणाम होऊन दृष्टी जाण्याची ही शक्यता असते. परंतु अनेकांना या आजाराबद्दल माहिती नसल्याने रूग्ण उशीरा डॉक्टरांकडे जातात. अशा वेळी वैद्यकीय तपासणी केली असता रूग्णाला म्यूकोर्मिकोसिस असल्याचं निदान होते. अशा स्थितीत संसर्गाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी शरीरातील ज्या भागात संसर्ग झाला आहे तो भाग काढून टाकावा लागत असल्याचे डॉक्टर सांगतात.