पालघर : कृषिपंपांना विजजोडणी आणि थकीत विजबिलाच्या वसुलीसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘कृषी वीज धोरण २०२०’ योजनेला पालघर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लाभ घेत जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत 1 कोटी 83 लाखांचा भरणा केलाय. शनिवारी डहाणू उपविभागात आयोजित मेळाव्यात 39 शेतकऱ्यांनी 3 लाख 74 हजार तर शुक्रवारी बोईसर ग्रामीण उपविभागात 105 शेतकऱ्यांनी 15 लाख 51 हजार रुपयांचा भरणा केला. योजनेत सहभागी होऊन कृषिपंपाच्या चालू वीजबिलासह थकबाकीवर जवळपास 66 टक्क्यांच्या सवलतीची सुवर्णसंधी साधून वीजबिलाचा भरणा करण्याचं आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना केलं आहे.
पालघर मंडल कार्यालयांतर्गत 13 हजार 421 कृषिपंप ग्राहकांकडे 20 कोटी 40 लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. नवीन धोरणानुसार कृषिपंप ग्राहकांना 3 कोटी 62 लाखांच्या चालू वीज बिलासह केवळ 11 कोटी 55 लाख रुपये भरायचे आहेत. आणि या व्यतिरिक्त उर्वरित रक्कम ही या योजनेतून माफ होणार आहे. योजनेला सुरुवात झाल्यानंतर तीन आठवड्यातच 1 कोटी 43 लाख रुपयांचा भरणा केला असून योजनेच्या माध्यमातून 57 शेतकऱ्यांना नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. तर वसई मंडल कार्यालयांतर्गत 5 हजार 511 कृषिपंप ग्राहकांकडे 4 कोटी 48 लाख रुपयांची थकबाकी आहे. 62 लाखांच्या चालू वीज बिलासह थकबाकीतील फक्त 2 कोटी 86 लाख रुपये भरल्यानंतर वसई मंडलातल्या सर्वच कृषिपंप ग्राहकांचं वीजबिल शून्य होणार आहे. या योजनेत सहभागी होत मंडलातल्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत 40 लाख रुपयांचा भरणा केला आहे. तर योजनेच्या माध्यमातून 9 कृषिपंपांना नवीन वीजजजोडणी देण्यात आली आहे.
बोईसर ग्रामीण उपविभागाअंतर्गत चिंचणी, वाणगाव, देलवाडी, नागझरी आणी इतर विविध गावामध्ये तसचं बोईसरच्या जांबुगाव आणि अस्वाली इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात मुख्य अभियंता अग्रवाल, अधीक्षक अभियंता किरण नागावकर, कार्यकारी अभियंता प्रताप मचिये, युवराज जरग यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी उपकार्यकरी अभियंते, जनमित्र, वित्त आणि लेखा विभागाचे कर्मचारी पंचक्रोशीतील सरपंच, ग्रामस्थ, शेतकरी आदी उपस्थित होते.