पालघर : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत जिल्ह्यातल्या वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यातल्या प्रकल्प कार्यालयात नोंदणीकृत अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगार युवक आणि युवतींसाठी येत्या २६ फेब्रुवारीला स्पर्धापरिक्षा, रोजगार आणि स्वयंरोजगार मार्गदर्शन महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हा महामेळावा सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत डहाणू नगरपरिषदेच्या बी.एस.ई.एस. हॉल मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
डहाणू प्रकल्प कार्यालयातल्या सेवायोजन विभागात नोंदणीकृत असलेल्या अनसूचित जमातीच्या इ. १० वी पास/नापास, १२ वी पास/ नापास, डिप्लोमा, आयटीआय, बीएड, डीएड, कृषि पदवी/ पदविकाधारक, कौशल्य विकास, बॅकिंग क्षेत्रात नोकरी तसचं स्वयंरोजगार करण्यास इच्छूक असलेल्या उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
महामेळाव्यात डहाणू प्रकल्प अधिकारी, कामगार कल्याण विभाग, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी, ITI, LIC, KVK या विभागाचे तज्ज्ञ तसचं विविध कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
त्यामुळे या रोजगार आणि स्वयंरोजगार मार्गदर्शन महामेळाव्यास नोंदणीकृत अनुसूचित जमातीच्या युवक-युवतींनी आवर्जून उपस्थित रहावं असं आवाहन डहाणूच्या प्रकल्प अधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे.