पालघर : आरोग्य ही खरी संपत्ती आहे. ही संपत्ती कमावली तर इतर गोष्टीही सहज साध्य करता येतात. योगाभ्यासाचे महत्त्व जनमानसात रुजावे म्हणून २१ जून हा दिवस जागतिक योगा दिवस म्हणून साजरा केला जातो. पालघर जिल्ह्यात आज विविध ठिकाणी योग दिन साजरा करण्यात आला. ज्यात वयोवृद्धापासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांनी उत्फुर्तपणे सहभाग घेतला. पालघर जिल्ह्यातल्या चिंचणी – तारापूर संस्थेच्या वतीनं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं संस्थेच्या सर्व शाखांमधल्या विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थांसाठी आणि नागरिकांसाठी योग शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं.
शासनाच्या सुदृढ राष्ट्रनिर्माणाच्या आवाहनास प्रतिसाद देण्याबरोबरच परिसरातल्या नागरिकांमध्ये योगजागृती निर्माण करणं आणि संस्थेतील विद्यार्थी, कर्मचारी आणि परिसरातले नागरिक आरोग्यसंपन्न रहावेत या उद्देशानं सलग तीन दिवसांपासून चिंचणीतल्या के.डी हायस्कूल मध्ये योग सराव शिबीराचे आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान या शिबीरात राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक पर्यवेक्षक प्रा.संजय घरत आणि पतंजलीचे जिल्हा युवा प्रभारी तथा संस्थेचे योग शिक्षक प्रा.सुधीर भांडवलकर यांनी शिबीरार्थींना योग – प्राणायामांची शास्त्रीय माहिती आणि प्रात्यक्षिके दाखवून सराव करुन घेतला. संस्थेचे चेअरमन रजनीकांत श्रॉफ यांच्या मार्गदर्शनाखाली या योगदिनाचं आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी संस्थेचे चेअरमन रजनीकांत श्रॉफ यांनी उपस्थितांना योगाचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळी संस्थेच्या सदस्या रमिलाबेन श्रॉफ, महेश पाटील, दुभाष अंभिरे, के.डी. व एम.के. ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य महेश रावते, उप-मुख्याध्यापक सुनिल बैसाणे, उप-प्राचार्य संगिता चुरी, पर्यवेक्षिका स्वाती राऊत, विभाग प्रमुख दिनकर टेकनर श्रॉफ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.प्रमिला राऊत, उप-प्राचार्या डॉ.सुचिता करवीर, आदि प्राध्यापक तसचं ग्रामस्त उपस्थित होते.
डहाणु तालुक्यातल्या कोसबाड कृषि विज्ञान केंद्रात आणि गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कोसबाड केंद्रातील सर्व शाळांत योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. योग ही भारताच्या प्राचीन परंपरेची एक अमूल्य देणगी असून ते मन आणि शरीराच्या ऐक्याचे प्रतीक असल्याचे मत यावेळी माध्यमिक विद्यालयचे मुख्याध्यापक पठाडे यांनी सांगितलं. त्यामुळे आपल्या बदलत्या जीवनशैलीत सर्वांनी योगाचे नियमित आचरण करावे असे आवाहन त्यांनी सर्वांना केले. यावेळी आचार्य शंकर भिसे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार केले. तसचं प्रा. अशोक भोईर यांनी योगासनांची प्रात्यक्षिके, प्रा. रुपाली देशमुख यांनी योगासनांचे महत्त्व उपस्थितांना सांगितले. योग दिनानिमित्त वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत कृषि प्रक्षेत्रावर फळझाडांची लागवड देखील इथे करण्यात आली. यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव, शास्त्रज्ञ भरत कुशारे, अनुजा दिवटे, अनिलकुमार सिंग, दामिनी, लिनिता तांडेल आदि उपस्थित होते.
पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकिय कार्यालयात देखील आज आंतराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी मानवी जीवनात योगाचे काय महत्व आहे हे पटवुन देतांना मन स्थिर ठेवण्यासाठी आणि मनावर नियंत्रण मिळविण्यासाठी काय करावे याबाबत सखोल मार्गदर्शन ब्रम्हकुमारीज जागृती बेन यांनी केले. तसेच आठ वर्षापासुन ४० पेक्षा जास्त योगा अभ्याक्रम पुर्ण केलेल्या, जागतिक प्रमाणपत्र धारक योगा प्रशिक्षक चंद्रकला भनुशाली यांनी जागतिक योग दिनी प्रशिक्षण सत्र घेतले.