पालघर : निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागानं आज मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खानिवडे टोलनाक्या जवळ ५५ लाखाच्या एका कंटेनर सह २६ लाख ३८ हजार रूपये किंमतीचं बनावटी मद्य जप्त केलं आहे.
पालघरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक बाबासाहेब पाटिल यांनी माहिती देताना सांगितलं की, त्यांना सूत्रांकडून माहिती मिळाली होती की, बनावटी मद्यानं भरलेला एक कंटेनर सिलवासाहुन मुंबईच्या दिशेनं जाणार आहे. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पालघरचे अधीक्षक सुधाकर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पालघरच्या पथकानं मध्यरात्री मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खानिवडे टोलनाक्याजवळ सापळा रचून परराज्यातलं विविध ब्राडचं बनावटी मद्य सिलवासाहुन मुंबईला घेवुन जात असताना अशोक लेलंड कंपनीच्या RJ 11GB 7873 या कंटेनरला पकडलं. या कंटेनर मध्ये २६ लाख ३८ हजार रूपये किंमतीचे असलेले विविध ब्राडचे बनावटी मद्य राज्य उत्पादन शुल्क विभागानं जप्त केले आहे.
दरम्यान अंधाराचा फायदा घेत कंटेनरचा वाहन चालक अत्ता ऊल्ला आणि बनावट मद्याचा व्यापारी निधी शर्मा हे दोघेही जण फरार झाले आहेत. या दोन्ही जणांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागानं महाराष्ट्र दारूबंदी कायद्यासह विविध कलमां अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.