पालघर : पालघर जिल्ह्यात मिशन झिरो ड्रॉप आऊट अंतर्गत ५ ते २० जुलै या कालावधीत शाळाबाह्य बालकांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पालघर , शिक्षण विभाग प्राथमिक /माध्यमिक आणि समग्र शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमानं हे सर्व्हेक्षण राबवण्यात येत आहे.
यात ३ ते १८ वर्षे वयोगटातल्या बालकांचं गाव, वाड्या, झोपडपट्ट्या मध्ये, वस्त्यांमध्ये तसचं शहरी भागातही सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात सापडलेल्या शाळाबाहय , अनियमित व स्थलांतरीत बालकांना पुन्हा वयानुरुप समकक्ष वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. या मोहीमे दरम्यान प्राप्त होणारा डेटा संकलित करण्यासाठी स्वतंत्र डॅश बोर्डची निर्मिर्ती करण्यात आली आहे. यात प्रत्येक दिवसाला किती मुलांचं सर्वेक्षण झालं, किती तालुक्यात तालुकानिहाय विद्यार्थी दाखल झालेत यासारखी माहिती मिळू शकेल.
जिल्ह्यात या पूर्वीच एक गाव एक बालरक्षक ही मोहीम प्रभावी पणे राबवली जात होती. या मोहीमे द्वारे शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात सातत्याने दाखल केले जात होते. मात्र या मिशन झिरो ड्रॉप आऊट या मोहीमे मुळे ही मोहीम आणखी प्रभावी होणार आहे. असा विश्वास जिल्हा परिषदेने व्यक्त केला आहे. येत्या २० तारखेपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.
शाळाबाह्य बालकांसाठी नजीकची शाळा उपलब्ध करावी, त्यासाठी सर्वेक्षणाद्वारे माहिती घ्यावी, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, नगरपालिका, मनपा प्रशासनानेही यात सहभाग घ्यावा असे निर्देशही पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी संबंधितांना दिले आहेत.