पालघर : राज्य सरकारच्या वतीने नवी पीक विमा योजना राबवली जाणार असून, त्यात एक रुपयात शेतकऱ्यांचा विमा काढण्यात येणार आहे. सर्वसमावेशक पीक विमा योजना असे योजनेचं नाव असून यासंदर्भात राज्य सरकारच्या कृषी विभागानं नुकताच शासननिर्णय जाहीर केला आहे. याच नवी पीक विमा योजनेचा लाभ शेतक-यांना देण्यासाठी पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड मध्ये कृषि विभागाच्या माध्यमातून पिक विमा कार्यालय सुरु करण्यात आलं आहे. मंगळवारी या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी विक्रमगड तालुक्याचे कृषी अधिकारी सुनील पारधी यांनी शेतकऱ्यांना पिक विमा योजनेबाबत मार्गदर्शन केलं. तसचं जास्तीत जास्त शेतक-यांनी पिक विमा काढावा याबाबत उपस्थितांना आवाहन देखील केलं. विक्रमगड तालुक्यात गेल्या एका आठवड्यात जवळपास आठशे पेक्षा जास्त शेतक-यांनी आपला पिक विमा उतरवला असल्याची माहिती यावेळी कृषी अधिकारी सुनील पारधी यांनी दिली.
एसआरटी पद्धतीचा वापर करून घेतलं ६० क्विंटल पेक्षा जास्त भाताचं उत्पादन…..
यापूर्वी पंतप्रधान पीक विमा योजनेत खरीप हंगाम २ टक्के, रब्बी हंगाम १.५ टक्के तर नगदी पिकांसाठी ५ टक्के पीक विम्याचा हफ्ता शेतकऱ्यांना भरावा लागत होता. उर्वरित शेतकऱ्यांच्या हफ्त्याची रक्कम राज्य शासन देत असे. मात्र यंदापासून शेतकऱ्यांना दोन्ही हंगामांसाठी केवळ एक रुपया भरावा लागणार आहे. शेतकऱ्यांच्या हिश्शाची उर्वरित रक्कम ही राज्य शासन भरणार आहे. त्याबरोबरच आग, वीज पडणे, वादळ, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, दुष्काळ, कीड, रोगराई, पावसाची अनियमितता, पूरपरिस्थिती, गारपीट, हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे पिकांची पेरणी न होणे, स्थानिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, काढणी पश्चात नुकसान आदी कारणांसाठी शेतकऱ्यांना पीक नुकसानीची भरपाई मिळणार आहे.