पालघर : वाढत प्रदूषण आणि मोठ्या प्रमाणात झाडांची होत असलेली तोड यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळू लागला आहे. पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल साबूत ठेवण्यासाठी आजच्या काळात झाडे जगवणे गरजेचं आहे. मनुष्याला ऑक्सिजन मिळण्यासाठी, सावली मिळण्यासाठी, उत्सर्जित होणारा कार्बनडाय ऑक्साईड शोषण घेण्यासाठी, औषधांसाठी यासारख्या अनेक मानवी गरजा भागवण्यासाठी आपल्याला वृक्षांची आवश्यकता भासते. सध्याच्या कडक उन्हाळ्यात प्रत्येक जण रस्त्याच्या कडेला किंवा इतरत्र थोड्यावेळ सावलीत विसावा घेण्यासाठी, थंडगार वारा मिळावा यासाठी झाडं शोधताना दिसून येतात. गरजेच्या वेळी मनुष्याला मग त्या झाडांची आठवण येते. मात्र मोठमोठ्या इमारती तयार करण्यासाठी असो किंवा इतर काही प्रोजेक्ट तयार करण्यासाठी सर्रासपणे वृक्षांची कत्तल केली जाते. आणि त्यामुळे पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. हे सर्व पाहता पर्यावरणाला सुखरूप ठेवण्यासाठी तसचं पर्यावरणाचा समतोल आबाधित राखण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक यांनी पर्यावरण संरक्षणाचा संकल्प हाती घेतला आहे.
पहा व्हिडीओ….
पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यातल्या लिलकपाडा इथल्या जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक दिपक देसले यांनी मोठ्या संख्येत सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा उपक्रम खाती घेतला आहे. शिक्षक दिपक देसले यांनी आयुर्वेदात उपयोगात येणाऱ्या आणि ग्रामीण आदिवासी भागातील लोकांना उदारनिर्वाहासाठी लागणाऱ्या आपटा, बहावा, रिठा, गुंज, साग, बोर, चिंच, काजू, लाजरा फुलकेसर, भेंडी, विलायती चिंच, करंज, अभय, रक्तचंदन, टेबरून, रामफळ, सीताफळ, हिरडा, बेहडा, बिबवा, खैर, देवदार यासारख्या जवळपास २२ प्रकारच्या झाडांच्या बिया विविध ठिकाणांहून जमा केल्या. आणि त्यानंतर आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून माती, शेण, विविध झाडांच्या बिया हे सर्व एकत्रित करून त्यापासून हे सीड बॉल तयार केले.
धरण उशाला आणि कोरड घशाला, रात्रभर विहिरी भोवती पहारा………….
या उपक्रमाला त्यांनी व्यापक रूप देण्याचा प्रयत्न केला आणि हीच प्रक्रिया त्यांनी डहाणू भागातल्या अनेक शाळांमधल्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. त्यानंतर डहाणू तालुक्यातल्या १४ शाळांनी, तलासरी तालुक्यातल्या 3 आणि पालघर तालुक्यातल्या 1 अशा 18 शाळांनी या पर्यावरणपूरक उपक्रमात सहभाग घेत 1 लाख १७ हजारांपेक्षा जास्त सीड बॉल तयार केले. या उपक्रमात 18 शाळांमधल्या 1 हजार 232 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
हे सीड बॉल्स जून, जुलै महिन्यात वनखात्याच्या परवानगीनं डोंगरावर आणि इतर काही ठिकाणी टाकण्यात येणार आहेत. ज्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी नवी झाडं तयार होतील. या विद्यार्थ्यांनी 1 लाख १७ हजारां पेक्षा जास्त सीड बॉल्स तयार करून आपला विक्रम नोंदवला आहे. या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी पर्यावरण संवर्धनासाठी केलेला हा विक्रमी उपक्रम इतर लोकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरू शकेल.