पालघर : महावितरणच्या (Mahavitaran) पालघर विभागातल्या मोखाडा (Mokhada) उपविभागात सुधारित वितरण क्षेत्र योजनेतून (RDSS) झालेल्या उल्लेखनिय कामांमुळे जवळपास ३० वाड्या-पाड्यांना अखंडित वीजपुरवठा मिळत आहे. या योजनेतून वीज वितरण यंत्रणेचं नुतनीकरण करण्यात आलं असून एरियल बंच केबल बसवण्यात आल्या आहेत. परिणामी या परिसरातले १,३०१ नवीन वीज ग्राहक महावितरणशी जोडले गेले आहेत.
मोखाडा तालुक्यातल्या भोवडी, खोच, मोखाडा, दुधगाव, नाशेरा, मोऱ्हांडा, तेली उंबरपाडा, पोशेरा, घोसाळी, आडोशी, धामोडीपाडा, गोंदे खुर्द, नांदगाव, निकमवाडी, देवबांध, पायऱ्यांची वाडी, सोनारवाडी, पेडक्याची वाडी, ठाकूरवाडी, धामणशेत, घानवळ, कळमपाडा, कुर्लोद, मनीपाडा, कापशीपाडा, शिरसगाव, पार्ध्याची मेट, पुलाची वाडी, विकासवाडी या गावांमध्ये एरियल बंच केबल बसवण्यात आली आहे. त्यामुळे या वाड्या आणि पाडे आकडे मुक्त बनली असून नवीन वीज जोडणीचं प्रमाण वाढलं. तसचं कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित २३८ ग्राहकांनी महावितरणच्या अभय योजनेचा लाभ घेत १० लाख रुपयांची थकबाकी भरून पुनर्जोडणी घेतली असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.
कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा, पालघर मंडलाचे अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे, कार्यकारी अभियंता सुनील भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली मोखाड्याचे उपकार्यकारी अभियंता राजेश शिवगण, शाखा अभियंते निखिल बनसोडे, किरण थाटे, आशा गायकवाड, जनमित्र, बाह्यस्तोत्र कर्मचारी, कंत्राटदाराचे कामगार यांच्या चमुने ही कामगिरी केली.