पालघर : पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार शहरात महानगरपालिकेनं गणेशोत्सव काळात संकलित झालेल्या निर्माल्यापासून खत निर्मिती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सात दिवसांच्या विसर्जना दरम्यान २१ हजार किलो निर्माल्य संकलित झालं आहे. बचत गटांच्या महिलांनी खतनिर्मितीची प्रक्रिया सुरू केली आहे. याशिवाय निर्माल्यातल्या टाकाऊ वस्तूंपासून विविध गृहोपयोगी वस्तू देखील तयार केल्या जात आहेत. एकिकडे कृत्रिम तलावांमुळे नैसर्गिक तलाव, खाड्यांचं संरक्षण केलं जात असून निर्माल्यापासून खतनिर्मितीमुळे महापालिकेचा गणेशोत्सव खर्या अर्थानं पर्यावरणपूरक ठरत आहे.
पालघर जिल्हा परिषद आणि CWAS संस्थेमध्ये सामंजस्य करार
या निर्माल्यापासून शहरात विविध ठिकाणी ८ बचत गटाच्या ५७ महिलांनी खत निर्मिती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. खत निर्मितीसाठी महिलांना जागा आणि साहित्य महानगरपालिकेनं उपलब्ध करून दिलं आहे. महापालिकेचे स्वच्छता दूत बचत गटातल्या महिलांना खत निर्मितीचं आणि वस्तू बनविण्याचं प्रशिक्षण देतात. या प्रशिक्षण मिळवलेल्या बचत गटाच्या महिलांना निर्माल्याापासून तयार झालेल्या खताची विक्री करून आर्थिक ही फायदा मिळतो.
पर्यावरणपूरक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्याचं वसई विरार शहर महानगरपालिकेचं हे तिसरं वर्ष आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून विसर्जना दरम्यान जमा होणारं निर्माल्य संकलित करून त्यापासून महिला बचत गटांकडून खतनिर्मिती करण्यात येते. शहर महानगरपालिकेनं विसर्जनासाठी १०५ कृत्रिम तलाव उभारले असून, त्या ठिकाणी निर्माल्य संकलित करण्यासाठी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर नैसर्गिक तलाव, खाडी, समुद्र आदी जिथं विसर्जन होत, तिथं ही निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत.
टाकाऊ पासून टिकाऊ :
निर्माल्य कलशात निर्माल्यासह प्लास्टिकच्या, सजावटीच्या आणि इतर टाकाऊ वस्तू सापडतात. त्यापासून विविध वापर करण्या योग्य वस्तू या बचत गटाच्या महिला तयार करतात. या वस्तुंच्या विक्रीतून महिलांना आर्थिक उत्पन्न ही मिळत.